अखेर दोन वर्षांनी मेर्वी परिसरातील बिबट्या जेरबंद

 


तालुक्यातील मेर्वी परिसरात ग्रामस्थांवर हल्ले करून दहशत पसरवणारा बिबट्या अखेर दोन वर्षांनी गुरूवारी पिंजऱ्यात जेरबंद झाला. बेहरे स्टॉप येथे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

पावस, मेर्वी या परिसरात सागरी मार्गावर गेली दोन वर्षे बिबट्याचे हल्ले होत आहेत. सायंकाळच्या वेळी या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर हल्ला करून बिबट्याने जखमीही केले होते. बिबट्याच्या हल्ल्यानंतर तातडीने वनविभागाला माहिती दिली जात होती. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होत होते. मात्र, बिबट्याला पकडण्यात अपयश येत होते.

या बिबट्याने आपला मार्ग बदलल्याने वनविभागाच्या ताब्यात तो सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमचे कॅमेरे व पिंजरेही लावण्यात आले होते. त्याचबरोबर मुंबईतील पथकही या भागात तळ ठोकून होते. या भागात ग्रामस्थांसमवेत दिवस - रात्र गस्तही सुरू ठेवण्यात आली होती. तरीही बिबट्या हुलकावणी देत होता. वनविभागाने या भागातील झाडेही कापून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न केले होते. तरीही बिबट्या सापडला जात नसल्याने गावात भीतीचे वातावरण होते.

गुरुवारी सकाळी या मार्गावरील बेहरे स्टॉप येथील पुलाखाली लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या फसल्याचे निदर्शनाला आले. गावातील ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाच्या अधिकारी प्रियांका लगड यांना दिली. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या बिबट्याला पकडून नेले.


Comments