सरकारची पाठराखण करण्यासाठी पवार यांचा दौरा
केंद्राकडे आपण अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याची मागणी केली आहे. केंद्राचे पथक येऊन पाहणी करणार आणि नंतर मदतीची प्रक्रिया हाईल याला वेळ लागणार आहे. तोपर्यंत राज्य सरकारने कशा पद्धतीने मदत करावी हे शरद पवार यांना ज्ञात आहे. सरकारने मदतीची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे. शरद पवार यांचा दौरा केवळ सरकारची पाठराखण करण्यासाठीचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शेतकऱ्यांना मदत करण्याची इच्छाशक्ती पाहिजे असे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेली प्रतिहेक्टरी २५ हजार रुपयांची मागणी त्यांनी पूर्ण करावी, असेही फडणवीस म्हणाले. या मागणीच्या ध्वनिचित्रफितीही पत्रकार बैठकीत त्यांनी दाखविल्या. उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी पत्रकार परिषद झाली.
जलयुक्त शिवारमधून नद्या, नाल्यांची कामे झाली नसती तर यापेक्षा कितीतरी अधिक पटीने शेतीचे नुकसान झाले असते. जलयुक्तचे सकारात्मक परिणाम येत्या काही महिन्यांत दिसतील.
चौकशी कराच..
विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी जलयुक्त शिवारच्या सहा लाख कामांपैकी ७०० कामांच्या निव्वळ तक्रारींच्या आधारे चौकशी करावयाची असल्यास ती बिनधास्तपणे करावी, मात्र आता राजकारण करण्याऐवजी नुकसानग्रस्त भागातील घरांसाठी अनुदान, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून आधार देणे गरजेचे आहे, असेही फडणवीस यांनी या वेळी नमूद केले. फडणवीस यांनी उस्मानाबाद तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Comments
Post a Comment