भारत बायोटेक कंपनीकडून लवकरच सुरू होणार कोरोना लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी

 


जगभरात कोरोनाच्या एकूण 60 लशींची वेगवेगळ्या टप्प्यात चाचणी सुरू आहे. याच दरम्यान एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी येत आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोरोनाच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारत बायोटेकला मान्यता मिळाली आहे. या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही देशभरातील 18 ते 19 वेगवेगळ्या ठिकाणी केली जाणार आहे अशी माहिती उच्च स्तरीय सूत्रांकडून मिळाली आहे. या चाचणीसाठी साधारण 22,000 स्वयंसेवक सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून भारत बायोटेकद्वारे स्वदेशी लशीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरू होणार आहेत. सध्या या लशीची देशात दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून करण्यात येईल असा अंदाज आहे. दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. याचबरोबर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देखील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोरोनाच्या लशीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

नुकतंच बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जाहीर केलेल्या जाहिरनाम्यात बिहारच्या जनतेला सत्तेत आल्यावर मोफत लस देण्याचे आश्वासन दिले आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसह (Indian council of medical research) भारत बायोटेकने तयार केलेली ही लस आहे. 

कोवॅक्सिनमध्ये एलहाइड्रॉक्सिक्विम-II (Alhydroxiquim-II) हा घटक मिसळण्यात आला आहे. ज्यामुळे लशीची क्षमता आणि प्रभाव अधिक वाढेल. शरीरात जास्तीत जास्त अँटिबॉडीज तयार होतील आणि रोगप्रतिकारक शक्ती जास्त कालावधीपर्यंत टिकून राहिल.

Comments