आबीटगाव येथील प्रौढाची १ लाख ३४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक


तालुक्यातील आबीटगाव येथील एका प्रौढाची तब्बल १ लाख ३४ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी त्यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण बापूसाहेब भेंगे (रा. आबीटगाव गावकरवाडी) यांनी दि. २३ सप्टेंबर रोजी फोन पे अॅपवरून त्यांचा मुलगा योगेश यास १५०० रूपये पाठविले. परंतु त्याला ते न मिळाल्याने भेंगे यांनी आपल्या मोबाईलवरून गुगल सर्च इंजिनच्या मदतीने फोन पे अॅपचे कस्टमर केअर नंबर शोधून काढले व आपले १५०० रूपये परत मिळविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी समोरील व्यक्तीने मोबाईलवरून त्यांच्या बँक ऑफ बडोदा चिपळूण व गारगोटी शाखेच्या खात्यातील माहिती मागवली. यामध्ये यूपीआय पीन मागून घेतला. यानंतर त्या संशयिताने त्यांच्या खात्यातील १ लाख ३३ हजार ८७७ रूपये काढले. त्यामुळे भेंगे यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल गमरे करीत आहेत.

Comments