रातांबी, राजिवली पोलिस पाटील पदे रिक्त
संगमेश्वर तालुक्यातील रातांबी आणि राजिवली या दोन गावांमधील रिक्त पोलिस पाटील पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी राजीवलीचे उपसरपंच संतोष येडगे यांनी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात संतोष येडगे यांनी सद्यस्थितीत असणारी वास्तुस्थिती मांडली आहे. रातांबी गावात २० वर्षांपेक्षा अधिक काळ पोलिस पाटील पद रिक्त असून गावात अनेकदा तंटे झाल्यास सोडवण्यासाठी कुटगिरी पोलिस पाटील यांना सहा कि.मीचा प्रवास करून जावे लागते. गावात पोलिस पाटील असला तर वेळीच हस्तक्षेप करुन तंटे सोडविले जातात. मात्र सद्यस्थितीत पोलिस पाटील नसल्याने अनेक वेळा वाद विकोपाला जातात. गावातील वाद मिटविण्यासाठी पोलिस ठाण्याला हस्तक्षेप करण्याचे प्रसंग अनेकवेळा घडले आहेत. ग्रामिण भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा पहिला पाया हा पोलिस पाटील आहे. मात्र रातांबी आणि राजीवली गावात पोलिस पाटील पदेच रिक्त असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
ही समस्या ओळखून येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राजिवली गृप ग्रामपंचायतचे उपसरपंच संतोष येडगे यांनी रातांबी व राजिवली या दोन्ही गावातील रिक्त पोलिस पाटील पदे तातडीने भरण्याप्रकरणी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी यांना निवेदन देत लक्ष वेधून घेतले आहे. रिक्त पदे तातडीने भरली जावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

Comments
Post a Comment