बोरिवली पश्चिम आय.सी.कॉलनी परिसरात एमएचबी पोलिसांनी इमारतीत सुरक्षेतेविषयीचे फलक लावून केली जनजागृती
बोरिवली पश्चिम आय.सी.कॉलनी परिसरात गेल्या महिन्यात चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता आज आज एमएचबी पोलिसांनी परिसरातील इमारतीमध्ये जाऊन नागरिकांमध्ये सुरक्षेविषयी जनजागृती केली. शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर व माजी नगरसेवक, मुंबै संचालक अभिषेक घोसाळकर यांनी विभागातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी आय.सी.कॉलनी परिसरात पोलीस गस्त वाढवली असून त्याचबरोबर टायगर स्कॉड पथक पोलिसांसोबत रात्री गस्त घालत आहेत. त्यामुळे परिसरात वाढत्या चोरीच्या घटनाना सध्या आळा बसला आहे.
दरम्यान आज बोरिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके, एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे व पोलीस अधिकाऱ्यांनी अभिषेक घोसाळकर यांच्यासमवेत परिसरातील इमारतीमध्ये जाऊन नागरिकांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी प्रत्येक इमारतीमध्ये पोस्टर लावण्यात आले. यामध्ये पोलीस ठाणे व पोलीस अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
लॉकडाउनच्या काळात अनेक पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असूनही पोलीस दल अपुरे पडत आहे. त्यामुळेच नागरिकांनीदेखील पोलिसांना सहकार्य करून काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्यास त्याची तात्काळ माहिती दिलेल्या संपर्क क्रमांकावर स्थानिक पोलिसांना द्यावी असे आवाहन वडके यांनी यावेळी केले. यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपस्थित नागरिकांनीही देखील पोलिसांना काही उपयुक्त सूचना केल्या.

Comments
Post a Comment