पुर्णगड किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी खर्च केला तब्बल साडेतीन कोटींचा निधी, प्रत्यक्षात काम झाले निकृष्ट दर्जाचे

 


रत्नागिरीतील पुर्णगड किल्ला ढासळल्यानंतर पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी तब्बल चार कोटी रुपयांची निविदा काढली. त्यानंतर या किल्ल्याच्या दुरुस्तिच्या कामाला सुरुवात झाली आत्तापर्यंत या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्ची झाला आहे. मात्र या किल्ल्याच्या दुरुस्तीचे जे काही काम झाले ते निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे दिसून येत आहे. 

निकृष्ट दर्जाचा चुना, सिमेंट आदींचा वापर यामुळे नव्याने केलेली काही बांधकामे ढासळून येत आहेत. किल्ला पूर्वी ज्या प्रमाणे होता त्याच धरतीवर नवीन किल्ला उभारणी व्हावी या हेतूने हे काम होणे गरजेचे होते. प्रत्यक्षात किल्ल्यावर चिरेबंदी बांधकाम होत आहे. 

पुर्णगड किल्ल्याच्या नविन निर्धारित केलेल्या कामामध्ये किल्ल्याच्या आतील व बाहेरील साफसफाई, स्मारकाच्या आतील भागाचा मलबा काढणे, किल्ल्यासाठी घातक असलेल्या वृक्षांची तोड करणे, जोत्यांवरील मलबा काढणे व साफसफाई, किल्ल्याचा पडलेला भाग पुन्हा पूर्वीप्रमाणे नविन बांधणे, किल्ल्याच्या आतील पदपथ दुरुस्ती, दारु कोठारांची दुरुस्ती, दरवाजे बसवणे आदी कामांचा समावेश आहे. 

मात्र प्रत्यक्षात ही कामे निकृष्ट दर्जाचे झालेली दिसून येत आहेत. या परिसरातील शिवप्रेमी व ग्रामस्थ हेमंत अभ्यंकर, संतोष तोडणकर व अजय भिडे यांनी माहीतीच्या अधिकारात माहीती काढली. त्या माहीती नुसार अंदाजपत्रकानुसार करण्यात येणारे काम आणि प्रत्यक्षता होत असलेले काम या खुप मोठा फरक जाणवत आहे. 

नविन केलेले बांधकाम पूर्वीप्रमाणे नसुन जांभा ची-यांचा वापर केला जात आहे. दरवाजे सडत चालले आहेत. दरवाजाच्या कड्या, कोयंड्या निकृष्ट दर्जाच्या आहेत. सिमेंट व चुना यांचा कमी प्रमाणात वापर होतो. स्वच्छता केलेली नाही. विशेष म्हणजे शिवकालीन दगड दिसून येत नाही. तलावाची उंची आवश्यकतेपेक्षा जास्त वाढविण्यात आली आहे. यामुळे येथे अपघात होण्याची भिती आहे. 

कामाच्या ठिकाणी शासकीय अभियंते उपस्थीत नसतात. त्यामुळे येथे काम करणा-या कामगारांवर शासकीय नियंत्रण नसते. त्यामुळे या सर्व कामाची तात्काळ राज्यस्तरीय चौकशी करण्यात यावी व संबंधीत ठेकेदारावर व अधिका-यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी हेमंत अभ्यंकर, संतोष तोडणकर व अजय भिडे यांनी केली आहे.

Comments