पिडीत महिलांना न्याय मिळण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न व्हायला हवे- अभिनेत्री सिद्धी वि.कामथ
भारतीय समाजामध्ये स्त्रियांच्या सामाजिक दर्जासंदर्भात कमालीचा विरोधाभास आढळतो. एका बाजूला स्त्रियांचे धर्माधिष्ठित गौरवीकरण (काल्पनिक) व दुसऱ्या बाजूला समाजात प्रत्यक्षात टोकाचे दुय्यम स्थान, शोषण असा हा विरोधाभास आहे. एका बाजूला ‘स्त्री-प्रतिष्ठा’ हा समाजाच्या श्रेष्ठत्वाचा निकष (पुस्तकी) व दुसऱ्या बाजूला सामाजिक स्तरीकरणामध्ये शेवटचे स्थान असा हा विरोधाभास आहे.भारतीय समाज मुख्यत: पुरुषप्रधान राहिला आहे. अर्थात, केरळमधील नायर, मंगळूरमधील शेट्टी, बंगाली समाज व काही भटक्या जमातींमध्ये स्त्रीप्रधानतेचे प्रमाण दिसते. परंतु, सर्वसामान्यपणे विचार करता, भारतीय समाजामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान असल्याचे प्रकर्षांने जाणवते.
तद्वतच, अनेक रूढी, परंपरा (अनेक धर्मातील) यांमुळे स्त्रियांवर अन्याय, शोषण, सामाजिक विभक्तीकरण झाल्याचे दिसते. स्त्रियांना सार्वजनिक जीवनातील सहभाग नाकारण्यात आला. या पाश्र्वभूमीवर भारतात स्त्रियांची भूमिका, त्यांचे शोषण, न्याय्य अधिकार यावर आधारित चळवळी व संघटना उभ्या राहिल्या.स्वातंत्र्योत्तर काळातील स्त्री-चळवळीचे तीन टप्पे करता येतील. १९४७ पासून ते १९७० च्या दशकापर्यंत राष्ट्र बांधणीच्या कार्याला प्राधान्य दिले गेले. अर्थात संविधानात अंतर्भूत मूलभूत हक्क व राज्याची मार्गदर्शक तत्त्वे यांमध्ये स्त्रियांचे हक्क व अधिकार यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला.
पण, या तरतुदींच्या अंमलबजावणीतील अपयशामुळे १९७० च्या दशकात स्त्री-चळवळीचा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील दुसरा टप्पा सुरू झाला. या टप्प्यामध्ये असमान वेतन, स्त्रियांचे ‘अकुशल’ कामगारांत वर्गीकरण, विनामोबदला श्रम, सामाजिक संस्थांमधील (जात, धर्म, वर्ग, कुटुंब इत्यादी) सत्तेच्या संरचनेतली पुरुषी वर्चस्व या समस्यावर भर होता. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील २१ व्या शतकातील टप्प्यामध्ये स्त्री-चळवळ स्त्री-पुरुष समानतेच्या पलीकडे जाऊन स्त्रियांची वैयक्तिक जीवन ठरवण्याची सत्ता व त्यांचे सक्षमीकरण यांसारख्या मुद्दय़ावर प्रकाश टाकते.भारतामध्ये स्त्री-चळवळीचा एक प्रवाह वरील आढाव्यावरून स्पष्ट होतो.
आजही अनेक गंभीर स्त्री-समस्या भारतीय समाजासमोर उभ्या आहेत. रूढी- परंपरांचा पगडा, प्रत्येक धर्मातील खासगी जीवन नियंत्रित करणारे धार्मिक कायदे (धर्मशास्त्र, शरीया, इ.) विपरीत स्त्री-पुरुष प्रमाण (९३३ : १०००), समान नागरी कायद्याचा अभाव, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, बलात्काराच्या घटना, नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न यांसारख्या समस्यांना स्त्री-समाजाला आजही तोंड द्यावे लागते. या समस्यांचे आकलन व त्यावरील उपाय यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.आजच्या युगात स्त्री ही शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करताना दिसते. तिला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले आहे. तिने स्वतःच्या कष्टाने, कर्तृत्वाने अन् आपल्या बुद्धीमतेच्या जोरावर आज हे अढळस्थान मिळवले आहे यात काही शंकाच नाही.
सर्व क्षेत्रात आघाडीवर असूनही तिच्यावर अन्याय हा होतंच आहे.उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील वाल्मिकी समाजातील एका युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. हे वास्तव अत्यंत संतापजनक आहे. आजपर्यंत सर्वच थरांत महिलासुरक्षेच्या प्रश्नांवर ठोस पावलं उचलली जात नाहीत. महिला असुरक्षित असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पुरुषी मानसिकता. त्याच बरोबर आपली डळमळीत राज्यशासन आणि निष्क्रिय न्यायव्यवस्था असे म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही.
स्त्री ही जगत जननी आहे तीचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे असे आपण नेहमी म्हणतो पण " बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी.. " आपण हे देखील विसरतो की ज्या भारतीय संस्कृतीत आपण वाढलो आहोत, ज्या समाजात राहतो आहोत, वावरतो आहोत त्या समाजातील स्त्री मग ती कोणत्याही जाती धर्मातील असो प्रथम ती आपली आई, बहीण, मावशी, आत्या असते तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा सकारात्मक आणि सदृश्य असायला पाहिजे आणि हाच दृष्टिकोन भारतातील प्रत्येक नागरिकाने ठेवला तर आपल्य़ा भारतात कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेची गरज महिलांना भासणार नाही. पण आजचे चित्र उलट आहे ही शोकांतिकाच..!
आपला भारत आज एकविसाव्या शतकात पदार्पण करत प्रगतीपथावर आहे. असे असुन सुद्धा आजही स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांची संख्या कमी होत नाही. स्त्रियांवर विनयभंग, बलात्कार, एकतर्फी प्रेम, घरगुती हिंसा, हुंडाबळी यासारख्या घटना होतात. भारतीय संविधानात स्त्रियांना स्वातंत्र्याचा, समानतेचा आणि सुरक्षिततेचा हक्क दिला आहे. याच हक्काच्या बळावर स्त्रियांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. जिजाऊ मातेने तर रयतेचा राजा छत्रपती घडविला, झाशीच्या राणीने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले, सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याने स्त्रियांना त्यांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या, आपल्या देशात अशी अनेक नावे आहेत की त्यांनी आपल्या कर्तृत्वावर उत्तुंग भरारी मारून आपला हक्कं प्रस्थापित केलेला आहे, समाजात मनाचा तुरा रोवलेला आहे.
परंतु याच हक्कांची सध्या मोठ्या प्रमाणावर गळचेपी होत आहे हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग यासाठी कायद्यात योग्य ती तरतूद केली पाहिजे, कठोर बदल करायला हवेत, गुन्हेगाराला फाशी किंवा सक्तीचा तुरुंगवास व्हायला हवा, जेणेकरून त्याला त्याच्या काळ्या कृत्याची जाणीव होईल या भावनेने निदान कायद्याला घाबरून का होईना असले विकृत कृत्य करण्यास पुन्हा तो धजावणार नाही. पण याबाबतीत महिलांनी देखील जागरूकता दाखवायला हवी. त्यांनी देखील सक्षम होण्याची खरी गरज आहे. यासाठी प्रथम स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे.
जर तरुण वर्गाने पुढाकार घेऊन गावातील, खेड्यापाड्यातील स्त्रियांना साक्षर केलं पाहिजे. तरच त्यांना त्यांच्या हक्कांची, अधिकारांची जाणीव होईल. तेव्हा भारत सरकारने आणि प्रत्येक राज्य सरकारने अशा तळागाळातील अनेक महिलांना त्यांच्या संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत, त्यांचे नियोजन केले तर अशा घटना घडणार नाहीत.फक्त कायदे करुन फायदा नाही तर त्याची अंमलबजावणी होते की नाही याचा आढावा सतत घ्यायला हवा.
स्त्रियांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची पथके प्रत्येक रेल्वेस्थानकाजवळ, चौपाटीजवळ, शाळेजवळ तसेच महाविद्यालयांजवळ सज्ज केले पाहिजे. अशी निर्णायक आणि ठोस पावले जर प्रत्येक राज्यशासनाने आणि आपल्या न्यायव्यवस्थेने उचलली तर समाजात होणाऱ्या अत्याचारी आणि पाशवी कृत्यांवर नक्कीच आळा बसेल. तेव्हा उत्तरप्रदेश मधील हाथरस मधील प्रकरणात वाल्मिकी समाजातील पिडीत यूवतीवर झालेल्या अत्याचारी घटनेची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने योग्य ती दाखल घेऊन पाशवी कृत्य करणाऱ्या नराधमांना आणि त्यांच्या या कृत्याला साथ देणाऱ्या सगळ्यांनाच मग ती व्यक्ती कोणत्याही स्तरावरील असो त्याला कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता, अजामीनपात्र ठरवुन त्यांनी फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे तरच पीडितेला योग्य न्याय मिळेल असे मत सिद्धी विनायक कामथ(अभिनेत्री, समाजसेविका),प्रवक्ता - भारतीय महाक्रांती सेना यांनी बोलताना व्यक्त करत अशा घटनांचा निषेध केला.

Comments
Post a Comment