महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने युती सरकारच्या काळात 1995 मध्ये सुरू केलेली योजना 2014 नंतर पुनरुज्जीवित करण्यात आली. आजवर या योजनेचा लाभ काही लाख कामगारांनी घेतला आहे. भाजपचे संगमेश्वर तालुका सरचिटणीस डॉ. अमितजी ताठरे यांच्या संकल्पनेतून गेली दोन वर्षे संगमेश्वर तालुक्यातील असंघटित बांधकाम कामगारांना सदर योजनेचा लाभ मिळवून देण्याचे कार्य अव्याहत सुरू आहे. आत्तापर्यंत संगमेश्वर तालुक्यातील अनेक बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना संबंधित योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
मागील टप्प्यात काही कामगार नोंदणी करण्यापासून वंचित राहिले होते. काही कामगारांचे नुतनीकरण बाकी होते. अशा सर्व समस्यांचे निराकरण करून कामगार बांधवांचे जीवन जास्तीत जास्त सुखमय बनविणे व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी गोळवली, संगमेश्वर येथील ग्रामविकास प्रकल्पामध्ये एका मार्गदर्शन कार्यक्रमाचे छोटेखानी स्वरुपात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा लाभ सर्वसाधारणपणे 300 कामगार बांधवांनी घेतला. यामध्ये समाजातील सर्वच घटकांचा अंतर्भाव होता. विशेष उल्लेखनीय बाब ही की यामध्ये तरूण, युवती व स्त्रियांचा सहभाग लक्षणीय होता. डॉ. ताठरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना योजना किती व्यापक स्वरूपाची आहे हे सुलभरीतीने सांगितले. यानंतर तालुकाध्यक्ष श्री. प्रमोदजी अधटराव यांनी असंघटित कामगार म्हणजे काय ते स्पष्ट केले. त्यांना संघटित केल्यास त्यांचे होणारे फायदे यावर मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाची अशा कामगारांप्रति असणारी तळमळ उपस्थित बांधवांना समजावून सांगून कामगार संघटना स्थापन करण्याचा मानस स्पष्ट केला. यावर उपस्थितांनी एकमुखाने मान्यता दिली. रत्नागिरी जि.प. चे माजी सदस्य व भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. राजनजी कापडी यांनी भाजपची ध्येयधोरणे स्पष्ट करतानाच 80% समाजकारण करणारा एकमेव पक्ष असल्याचे सांगितले. विकासाच्या नावावर तात्पुरत्या स्वरूपाचे काम करणारे इतर पक्ष व शासकीय योजना घराघरापर्यंत पोचवून जनसामान्यांना हक्काचा लाभ मिळवून देणारा भाजप यांची तुलना कधीही होऊ शकत नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी नोंदणी केलेल्या संगमेश्वर तालुक्यातील 42 कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप करण्यात आले. यावेळी नोंदणी करण्यासाठी 6, 7, व 8 नोव्हेंबर या दिवसांपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी असे जाहीर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष हरीभाई पटेल साहेब, तालुका उपाध्यक्ष मिथुनजी निकम, विनोदजी म्हस्के, युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस सतिशजी पटेल, महिला तालुका उपाध्यक्षा सौ.राजश्रीताई कदम, तालुका कार्यकारीणी सदस्य गणपतजी कांबळे, ओबीसी सेल तालुका सचिव निखिलजी लोध, शक्ती केंद्रप्रमुख दिनेशजी मालप, दत्ताजी देवरुखकर, बुथप्रमुख अमेयजी सुर्वे, राजुजी ब्रिद उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनजी शिंदे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक अंतराचे भान राखून करण्यात आले होते.
Comments
Post a Comment