विद्यार्थी निघाले निर्जनस्थळाच्या शोधात.. चिंताऑनलाईन परिक्षेची

 

सर्वच विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहे. परीक्षा एप्रिल, मे महिन्यात होवून जुन-जुलैमध्ये निकाल अपेक्षित असताना कोरोनाच्या संकटामुळे आधीच तीन महिने विलंबाने परीक्षा होत आहे. मोबाईल कव्हरेज राहत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. कव्हरेज असलेले निर्जनस्थळे विद्यार्थी परीक्षेसाठी शोधताना दिसत आहे.

ऑनलाईन परीक्षा होत असल्याने मोबाईल कव्हरेज अगदी चांगले असणे अपेक्षित असते. सध्या अनेक कंपन्याच्या कव्हरेजच्या तक्रारी आहेत. त्यानंतर वेळेचे बंधनही परीक्षेकरिता असल्यामुळे घरातील व्यक्तींचा, रस्त्यावरील वाहनांचा, हार्न व इतर आवाजामुळे परीक्षार्थ्यांना बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरानजिकच्या निर्जन व उंच स्थळाचा ग्रुपमध्ये जावून युवक शोध घेताना दिसत आहे. 

आपल्या भ्रमणध्वनीवर त्या परिसरात कव्हरेज मिळेल की नाही, याची तपासणी करून स्थळ निवडत आहेत. काही निर्जनस्थळावर झुडुपे असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे. मात्र अंतिम वर्षाची परीक्षा असल्याने व त्यावरून पुढील शिक्षणाची वाट मोकळी होत असल्याने विद्यार्थी उत्साही आहेत. अंतिम परीक्षा आॅनलाईनद्वारे घेण्याची घोषणा होताच विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करून घेतली आहे.

Comments