रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधनांचे वितरण

 


समग्र शिक्षा, समावेशीत शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य साधने वितरीत करण्यात येतात. सन २०१९-२० मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचे राज्य स्तरावरुन अलिम्को संस्थेमार्फत मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २४४ दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी २१५ विद्यार्थ्यांना  ३२२ साहित्य साधने प्राप्त झाली आहेत. सध्या कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव पाहता साहित्य वितरणाचा कार्यक्रम घेता येणे शक्य नसल्यामुळे प्रातिनिधीक स्वरुपात एक विद्यार्थी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कक्षात बोलावून साहित्य वितरीत करण्यात आले. 

रत्नागिरी तालुक्यातील निवळी पूल येथील कु.स्नेहांक संदीप आडविलकर या विद्यार्थ्याला व्हीलचेअर, सी.पी.चेअर, एम.आर.किट वितरीत करण्यात आले. या वितरण कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, खेड-दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती डॉ.इंदूराणी जाखड, शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनिल मोरे, शिक्षणाधिकारी श्रीमती निशादेवी बंडगर आदी उपस्थीत होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रविंद्र कांबळे, तसेच समावेशीत शिक्षण जिल्हा समन्वयक श्रीमती विद्या पवार यांनी केले.

Comments