चिपळूण बसस्थानकाचे काम लवकरच मार्गी लावून प्रवाशांची गैरसोय दूर करा... माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण यांची परिवहन मंत्र्यांकडे मागणी

 

चिपळूण मध्यवर्ती रा.प. बसस्थानकाचे काम गेले दोन-तीन वर्षांपासून ठप्प आहे. नवीन बांधण्यात येणारे बसस्थानक हे अत्याधुनिक पद्धतीने उभारले जाणार आहे. सदर स्थानकाची जुनी इमारत विस्थापित करून नवीन काम सुरू झाले होते, परंतू इमारतीच्या पायाभरणीचे काही प्रमाणात काम झाल्यानंतर पुढील काम अद्यापही पूर्णतः ठप्प आहे. त्यामुळे पुरेशा जागे अभावी प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रवासीवर्ग, जनता तसेच लोकप्रतिनिधींमध्ये संतापाचे वातावरण आहे. 

या पार्श्वभूमीवर चिपळूण- संगमेश्वर चे माजी आमदार श्री. सदानंद चव्हाण यांनी आज परिवहन मंत्री मा.श्री.अनिल परब यांची मंत्रालय, मुंबई येथे भेट घेतली व निवेदन देऊन सविस्तर चर्चा करत सर्व परिस्थिती परिवहन मंत्री यांना अवगत केली. तसेच लवकरात लवकर सदर बसस्थानकाचे काम सुरू होऊन प्रवाशांची गैरसोय टाळण्याबाबत मागणी केली. 

सदर भेटीतील चर्चेच्या वेळी परिवहन मंत्री मा. श्री. अनिल परब यांनी सांगितले की, चिपळूण बसस्थानक उभारणीच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या निधीपैकी काही निधी लवकरच उपलब्ध करून देऊन काम पूर्ण क्षमतेने सुरु करू, अशी ग्वाही दिली.

Comments