शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नका; फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी


राज्य सरकारने तात्काळ पंचनामे संपवले पाहिजेत, पंचनामे होणार नाही तिथे मोबाइलने फोटो पाठवल्यास मदत दिली जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दीर्घकालीन मदतीसाठी वेळ लागेल, पण तात्काळ मदत केली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत. “मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात काही जणांना चार हजार, पाच हजार अशी मदत देण्यात आली. अशा प्रकारची मदत करुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करु नये,” असं यावेळी त्यांनी सांगितलं. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फडणवीसांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत नसताना प्रती हेक्टर २५ हजारांची मदत करण्याची मागणी केली होती यासंबंधीचा व्हिडीओ दाखवला. मुख्यमंत्र्यांकडे आपली मागणी पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांनंतर काही दिलासा मिळालेला दिसत नाही अशी टीका करताना इच्छाशक्ती असेल तर मदत करता येते, घोषणा करुन समाधान होणार नाही असं ते म्हणाले आहेत.

‘जे सत्तेत असतात त्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तेच इतकं राजकीय बोलत आहेत. हे योग्य नाही. मला राजकारणात रस नाही. तुम्ही राजकीय बोललात तर मी राजकीय बोलेन. संवेदनशीलता दाखवत शेतकऱ्यांना काय दिलासा देता येईल अशा वक्तव्याची अपेक्षा आपण राज्य सरकारकडून करत आहोत,” असं यावेळी फडणवीसांनी म्हटलं. “शरद पवारांना सगळं माहिती असताना जाणुनबुजून केंद्राकडे टोलवत आहेत. पंतप्रधान संवेदनशील आहेत ते मदत करतील. युपीएपेक्षा जास्त मदत सरकार करेल,” असंही ते म्हणाले आहेत.

“या सरकाराचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर आहे. ते सरकारचा बचाव करत असून चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्या इतका जाणकार कोणीच नाही,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. “मी याआधी कधीही मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका केली नाही. दौरा करा, करु नका पण भरघोस मदत करा,” अशी मागणी फडणवीसांनी केली आहे.

“पिकांचं नुकसान तर झालंच आहे पण जमीनही खरडून गेली आहे. मशागत करण्यासाठी शेतकऱ्याला एकरामागे ५० हजारांचा खर्च येतो. अशा परिस्थितीत माती वाहून जाते तेव्हा पीक घेणं अशक्यप्राय होतं. खरडून गेलेल्या जमिनीवर पुन्हा माती वाहून आणण्यासाठी योजना करण्याची गरज आहे. आम्ही तशी योजना आणली होती. गाळ शेतकऱ्यांच्या विहिरीत गेला असून तो उपसण्यासाठी योजना तयार करावी लागेल. फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही शेतकऱ्यांना सहा महिन्यातच वीमा संपला असं सांगितलं जात आहे. सरकराने दबाब आणून मदत करण्याची गरज,” असल्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Comments