रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व चिरेखाणींवर तात्काळ कारवाई करा

 


रत्नागिरी जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व अवैद्य चिरेखाणी यांचा ताबडतोब तपास घेऊन त्यांच्यावर व आरोपींवर ठोस व तात्काळ कारवाई करावी अशा सूचना महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन होत आहे. त्याचप्रमाणे शासनाचे आदेश नसतानादेखील चिरे खाणी सुरू झाल्या. 

सध्या चिरेखाणी च्या बाबतीत शासनाने अध्यादेश काढलेला असला तरीदेखील चिरे खाणी कशा पद्धतीने सुरू कराव्यात यासंदर्भात आदर्श नियमावली तयार करण्यात आलेली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या त्याचप्रमाणे अवैध वाळू उत्खनन करणा-या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा सूचना अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. अब्दुल सत्तार शनिवारी रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलत होते.

समुद्रकिनारे व कातळी भाग यांचे ताबडतोब सर्वेक्षण व्हावे. व अवैध चिरेखाणी व अवैध वाळू उत्खनन यांच्यावर कारवाई करावी. जे अधिकारी अथवा महसूल प्रशासनातील तलाठी किंवा मंडळ अधिकारी यासंदर्भात ठोस भूमिका घेत नसतील किंवा काम करत नसतील तर त्यांच्यावरच कारवाई करण्यात यावी अशा सूचना देखील जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या सूचनांप्रमाणे खरोखरच अंमलबजावणी होणार का हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments