अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेज; दिवाळीपूर्वी होणार मदतीचे वाटप

 


राज्यात जून ते  ऑक्टोबर २०२० या काळात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तसेच पायाभूत सुविधांच्या फेरउभारणीसाठी १० हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर केले. त्यानुसार  जिरायत आणि बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी १० हजार रुपये (२ हेक्टरपर्यंत)तर फळपिकांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये (२ हेक्टरपर्यंत) मदत देण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम पोहोचती करा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या नुकसानीसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नुकसानग्रस्त शेती आणि फळपिकासाठी राज्य  सरकारने एनडीआरएफच्या निकषापेक्षा पुढे जाऊन मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब हे दूरदृश्य प्रणालीद्वारे तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील,  मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.

निधीतून कामे

अतिवृष्टीने रस्ते, पुल, वीजेच्या पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा योजना, घरे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत इमारती आणि शेतजमीनीचे जे नुकसान झाले त्याची कामे या निधीतून केली जातील. मृत व्यक्तीच्या वारसांना तसेच पशुधन मृत्युमुखी पडले असेल आणि घर पडलेले असेल तर निकषाप्रमाणे मदत देण्यात येईल. 


Comments