डॉ. बोल्डे यांच्याकडे कार्यभार द्यावाच लागेल!

 


कोरोनाचा कहर वाढत असताना जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. बोल्डे यांना कार्यभार न देता खेळखंडोबा सुरू आहे. याविरोधात मॅग्मो संघटनेने राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. संघटनेच्या या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

सुरवातीच्या काळात रत्नागिरीमध्ये फारसे कोरोनारुग्ण नव्हते. त्या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याची घोषणासुद्धा केली. परंतु दुसर्‍याच दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या सार्‍याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. कोरोनावर उपाययोजना करण्यात मग्न असणार्‍या शल्यचिकीत्सकांना रजेवरून येऊनही कार्यभार न देणे म्हणजे खेळखंडोबाच आहे. याबाबत मॅग्मो संघटनेने यवतमाळप्रमाणे येथेही राजीनामासत्र सुरू करू, असा इशारा दिला आहे. जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्‍न  निर्माण होत असताना आरोग्य यंत्रणेची पिळवणूक करण्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप माने यांनी केला.

गेले सात महिने कोरोनाच्या काळात अपुर्‍या कर्मचार्‍यांवर जिल्ह्यातील सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही परिस्थिती अत्यंत भयावह आहे. जिल्ह्यात केवळ 5 अधिकारी हे वर्ग एकचे आहेत. मात्र फिजिशियनसह अन्य विभागातील डॉक्टरांची वानवा जाणवत आहे. ही स्थिती सुधारण्याऐवजी जिल्हा प्रशासन कार्यभार न देण्याची भाषा करते. यातच काहीतरी गौडबंगाल आहे. त्यामुळे डॉ. बोल्डे यांना कार्यभार त्वरित द्यावा, या मागणीसाठी आमचाही पाठिंबा असल्याचे बाळ माने यांनी स्पष्ट केले.

Comments