मुलीसोबत राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले...


भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. एवढंच नाहीतर 22 ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी माहितीही समोर आली आहे. पण, आता दस्तरखुद्द एकनाथ खडसे यांनी 'अजून असा कोणताही निरोप आला नाही', असा खुलासा केला आहे.एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीमध्ये 22 ॲाक्टोबर रोजी प्रवेश होणार अशी चर्चा सुरू आहे.

मात्र, अद्याप मला याबाबत काहीही सांगितलेलं नाही. राष्ट्रवादीकडून अजून कुठलाही निरोप नाही. याबद्दल अजून चर्चा व्हायची बाकी आहे, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.त्याचबरोबर मी अद्याप भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला नाही, असंही एकनाथ खडसे यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीही एकनाथ खडसे यांनी एनएआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना 'आपण भाजपचा राजीनामा दिलेला नाही' असं सांगितले होते. परंतु, दुसरीकडे खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेशाची जोरदार तयारी केली आहे.तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे हे 22 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे यांचा प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.मुंबईतील प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा संपन्न होणार आहे. एवढंच नाहीतर  खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करून दुसरा धक्का देणार आहे.तर दुसरीकडे, 'असे मुहूर्त रोज सांगितले जात असतात. मी त्यावर बोलणार नाही' असं म्हणत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचे टाळले आहे.

Comments