एसटी बस कर्मचाऱ्यांना दिलासादायक बातमी,परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती


लॉकडाउनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प झालेली राज्याची लालपरी अर्थात एसटी बस वेगाने धावू लागली आहे. मात्र, पगार थकल्यामुळे एसटी कर्मचारी हवालदील झाले आहे. अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबद्दल ट्वीट करून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार येत्या गुरूवारी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी ट्विटरवरून दिली आहे.

'एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत मी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याचे त्यांनी मान्य केले. कर्मचाऱ्यांचा एका महिन्याचा पगार येत्या गुरुवारपर्यंत त्यांच्या खात्यात जमा होईल.' असं परब यांनी सांगितले.त्याचबरोबर, 'उरलेले पगारही लवकरच दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अजित पवार यांच्या सोबत झालेल्या चर्चनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.याआधीही ऑगस्ट महिन्यात एसटी कामगारांच्या थकीत पगाराचा मुद्दा समोर आला होता. तिजोरीत खडखडात झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार देण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता.

 त्यानंतर राज्य सरकारने निधी मंजूर केला होता.तातडीने एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा बँक खात्यात जमा करण्यात आला होता. मार्च आणि एप्रिल महिन्यातील थकीत पगार सुद्धा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. मार्च महिन्यातील थकीत 50 टक्के  एप्रिल 75 टक्के तर मे महिन्यातील 100 थकीत वेतन एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. मे, जून आणि जुलै महिन्यातील थकीत वेतनही देण्यात आले होते.

विशेष म्हणजे, ऑगस्ट महिन्यातच अजित पवार यांनी  एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी 550 कोटी मंजूर  केले होते त्यानंतर लगेच वाटप करण्यात आले होते.दरम्यान, थकीत वेतन दिल्यानंतर 20 ऑगस्टपासून राज्यात एसटी बस वाहतूक सुरू करण्यात आली होती. कोरोनाच्या परिस्थितीमुळे सुरुवातील एका आसनावर एकच प्रवाशी अशा अटीने बससेवा सुरू करण्यात आली होती.  त्यानंतर आता पूर्ण आसन क्षमतेनं बससेवा चालवली जात आहे.

Comments