वन्य प्राण्याच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून राजापूरात बिबटयाचा मृत्यु



वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून एका बिबटयाचा मृत्यु झाल्याची घटना तालुक्यातील खिणगिणी गावात घडली आहे. त्यामुळे अशा प्रकारे फासक्या लावून शिकारी करणाऱ्या शिकाऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून या प्रकरणी वनविभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे.

नर जातीचा हा बिबटया असून त्याचे वयोमान सुमारे नऊ ते दहा वर्षे इतके असून शेपटीपासून त्याची लांबी २३४ सेेंमी तर उंची ५७ सेंमी असल्याची माहिती राजापूर वनपाल सदानंद घाडगे यांनी दिली आहे. बुधवारी सकाळी ही घटना उघड झाली आहे.

या प्रकरणी खिणगिणी गावातील ग्रामस्थ  व तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभात पाध्ये यांनी वनविभागाला अशा प्रकारे फासकीत अडकून बिबटयाचा मृत्यु झाल्याची माहिती दिली. खिणगिणी गावात कोयंबा या ठिकाणी ही घटना घडली आहे. या ठिकाणी वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फासकीत या बिबटयाची मान अडकून या बिबटयाचा मृत्यु झाला आहे. सुमारे दोन ते तीन दिवसापुर्वी या बिबटयाचा मृत्यु झाला असावा असा कयास आहे.

या घटनेची माहिती मिळताच राजापूर वनपाल सदानंद घाटगे, वनरक्षक संजय रणधीर यांसह वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. तर राजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे, पोलीस कर्मचारी श्री. वाघाटे, सागर कोरे, श्री. घोगले आदी घटनास्थळी पोहचले. वनक्षेत्रपाल प्रियंका लगड व उपविभागिय वनअधिकारी श्री. खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने या मृत बिबटयाचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सुर्वे यांनी  शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाच्या वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात  आले.

मात्र अशा प्रकारे फासकीत अडकून बिबटयाचा मृत्यु झाल्याने प्राणीमित्रांतुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून अशा प्रकारे फासक्या लावणाऱ्यांचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा व या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पुढे आली आहे.

Comments