“आजपर्यंत देशातील जनतेने कधीही…”; हाथरस प्रकरणावरुन शरद पवारांनी योगी सरकारला सुनावलं
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. याच प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही योगी सरकारवर निशाणा साधला आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी हाथरस येथे घडलेल्या घटनेनंतर ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या त्यामध्ये राज्य सरकारने कायद्याला कवडीचीही किंमत दिली नाही असा टोला लगावला आहे.
उत्तर प्रदेशमधील घटनेतील तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह तिच्या कुटुंबियाच्या हाती दिला नाही. प्रशासनाने परस्पर तिच्या पार्थिवाची विल्हेवाट लावली आहे. अशा प्रकारची घटना आजपर्यंत देशातील जनतेने कधीही पाहिली नाही. हे प्रकरण हाताळताना उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेतला असून त्यांनी अगदीच टोकाची भूमिका घेतली आहे. या कृतीतून कायद्याला कवडीची किंमत दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे, असं शरद पवार हाथरस येथील प्रकरणाबद्दल भाषम्य करताना म्हणाले.
काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना न भेटू देण्याच्या योगी सरकारच्या निर्णयावरही पवारांनी भाष्य केलं. राहुल गांधी तिथे भेटण्यास जातात पण त्यांना जाऊ दिले नाही. त्यांना जाऊ द्यायला हवं होतं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे शांततेच्या मार्गाने तिथे गेले होते. तसंच त्यांना पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घ्यायची होती. त्यांच्यासोबत जे काही घडलं तेही योग्य नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.

Comments
Post a Comment