कोकणातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा : निलेश राणे यांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र
परतीच्या पावसाने कोकणातील भातपिकाचे अतोनात नुकसान झाले असून त्यामुळे शेतकऱ्याचा कणाच मोडला आहे. आशा परिस्थितीत सरकारने तत्काळ मदत करावी अशी मागणी, भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना किमान 1 लाख 50 हजार हेक्टरी मदत घ्यावी तसेच प्रत्यक्ष पंचनामे करून सरसकट पीक विम्याचा लाभ दिला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी, कोकणात तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 35 हजार हेक्टर खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1800 हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 6000 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात 99 टक्के भातपिक असून 1 टक्के नाचणी पीक आहे, हे नुकसान कृषी विभागाने नजरअंदाजाने घेतलेले आहे. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर पिकाची हानी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून प्रत्यक्ष होणे गरजेचे आहे. कृषी सहायकाकडून हे पंचनामे होणे आवश्यक आहे. एनडीआरएफ च्या निकषानुसार हेक्टरी 6 हजार 800 रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. ती अतिशय तुटपुंजी आहे. कारण एकरी 2 हजार 700 रुपयेच मिळतात. कोकणात गुंठेवारी असल्याने नुकसानीपोटी शेतकऱ्याला फक्त 70 ते 80 रुपयेच मिळतात. त्यामुळे ही नुकसानभरपाई किमान गुंठ्याला 1 हजार ते 1 हजार 500 रुपये मिळणे आवश्यक आहे. म्हणजेच हेक्टरी 1 लाख 50 हजार मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्याची वर्षभराची रोजी रोटी भागवू शकतील.
अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा देखील घेतला आहे. मात्र 50 पैसे पेक्षा कमी आणेवारी आली तरच या पिकविम्याचा लाभ शेकऱ्यांना मिळतो, त्यामुळे सन 2017 मध्ये ओखी वादळात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट विमा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ घेता आला. त्याच धरतीवर यंदाही सरकारने कोणतेही निकष न लावता पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी करतानाच आपला शेतकरी जगला तर आपण जगू या मुद्द्यावर त्यांनी लक्ष वेधले आहे.

Comments
Post a Comment