कोकणातल्या लोककला जपण्यासाठी सांघिक भावनेने प्रयत्न करूयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
कोकणातल्या लोककला या भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय लोककला म्हणून ओळखल्या गेल्या पाहिजेत. संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाचे संकट आल्यामुळे लोककला देखील संकटात आले आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याशी सविस्तर चर्चा करून राज्यातल्या लोककलांना व त्यामध्ये सामील असणाऱ्या कलाकारांना शासनाकडून चांगल्या स्वरूपात मानधन मिळावे असे मागणी मी स्वतः केली आहे. कोकणातल्या लोककला जपण्यासाठी सांघिक भावनेने एकत्र येऊन प्रयत्न करूयात असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी माळ नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात केले.
रत्नागिरीतील माळ नाका येथील स्वयंवर मंगल कार्यालयात गुरुवारी सन्मान लोककलांचा या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, झाकडी, भजन व कीर्तन यांची मंडळे, कलाकार उपस्थित होते. या मंडळांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपये आर्थिक स्वरूपात मदत करण्यात आली.
या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती बाबू म्हाप, माजी अध्यक्षा सौ.स्नेहा सावंत, रत्नागिरी पंचायत समिती सभापती सौ.प्राजक्ता पाटील, रत्नागिरी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. ऋतुजा जाधव, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment