संगमेश्वरमधील रांगव धरणाची जबाबदारी नेमकी कोणाकडे?
तालुक्यातील रांगव येथील जलसंपदा विभागाच्या धरण प्रकल्पाचे काम आजतागायत पूर्ण नसल्याने लघु पाटबंधारे विभागाने या धरणाचा ताबा घेतला नसल्याची माहिती या विभागाचे उपअभियंता वैभव शिंदे यांनी दिली. त्यामुळे या धरणाची सुरक्षा रामभरोसे असून, पिचिंगवरील खैर चोरीबाबत लघु पाटबंधारे विभागाने हात झटकले आहेत. तालुक्यातील रांगव धरणाच्या पिचिंगवरील व धरणाच्या हद्दीतील खैराची तोड झाल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले. त्यानंतर वन विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली. मात्र, यासाठी हे खैर ज्यांच्या मालकीच्या जागेत होते. त्या लघु पाटबंधारे विभागाने याबाबतची तक्रार दाखल करावी, अशी वन विभागाची अपेक्षा होती.
पिचिंग खणून खैराची चोरी होणे ही धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब असतानाही लघु पाटबंधारे विभागाने याची दखल घेतली नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत जाणून घेण्यासाठी या धरणाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलेले उपअभियंता वैभव शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी सांगितले की, या धरणाचे काम पूर्ण झालेले नसल्याने लघु पाटबंधारे विभागाने धरणाचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे अशा घटनांची जबाबदारी ही पर्यायाने ठेकेदाराचीच असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदाराने धरणाचे काम पूर्ण झाल्यावर धरणाची सर्व स्वच्छता करून धरणाचा ताबा लघु पाटबंधारे विभागाकडे देणे निविदेप्रमाणे बंधनकारक असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
त्यामध्ये काही तांत्रिक बाबींचाही अडथळा असल्याचेही ते म्हणाले. या धरणाच्या वाढीव उंचीचा प्रस्ताव शासन दरबारी असून, तो मंजूर झाल्याशिवाय या धरणाचे काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे ठेकेदाराचेही अंतिम बिल अदा होणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले. सध्या या धरणाचा ताबा ठेकेदारकडे असून, धरणाची पूर्ण जबाबदारी ही ठेकेदाराचीच असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ठेकेदाराने या धरणाकडे गेल्या अनेक वर्षात पाहिलेलेच नसल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या धरणाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

Comments
Post a Comment