महावितरणची ११ केव्ही क्षमतेची विद्युतभारीत वाहिनी ओढ्यात पडल्याने शॉक लागून पितापुत्राचा जागीच मृत्यू
शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडलेल्या या घटनेने नाणार गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे . शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास नाणारमधील ४२ वर्षीय ग्रामस्थ असलेले ग्रामपंचायतीतील शिपाई दिवाकर पूजारी हे आपला इयत्ता चौथीतील दहा वर्षीय मुलगा अथर्व याच्यासह गावातीलच ओढ्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते . याच ओढ्यावरून महावितरणची ११ केव्हीची विद्युत वाहिनी गेलेली आहे . या वाहिनीच्या कंडक्टर तुटल्याने विद्युतभारित वाहिनी ओढ्यात कोसळली .
याच दरम्यान, हे दोघे पितापुत्र खेकडे पकडण्यासाठी ओढ्यात उतरले होते . त्यांना जबर शॉक बसून त्यांचा मृत्यू ओढवला . या दुर्घटनेनंतर महावितरणचे अधिकारी अपघातस्थळी पोहोचले होते . रात्री उशीरापर्यंत घटनेची माहिती घेण्याचे व पंचानामा करण्याचे काम सुरू होते. तहसीलदार प्रतिभा वराळे यांना दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांनी महसूल व महावितरण प्रशासनाला सहकार्याच्या सूचना केल्या .

Comments
Post a Comment