नववर्षाचे स्वागत कोरोना लसीने होण्याची आशा; आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा
जगासोबत करोडो भारतीयांचेही कोरोना लसीकडे डोळे लागले आहेत. मात्र, कोरोना व्हायरसवर लस आज येईल उद्या येईल या आशेवरच सारे आहेत. भारतातील काही कंपन्यांसह जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांच्या कोरोना लसींची चाचणी अंतिम टप्प्यात सुरु आहे. यावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना लस कधी मिळणार हे सांगितले आहे.
डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्रीगटाला याची माहिती दिली. मंत्रीगटाच्या 21 व्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, हरदीप सिंह पुरी आदी मंत्री उपस्थित होते. पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लस भारताला मिळण्याची आशा आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, नववर्षाच्या सुरुवातीला आम्हाला एकापेक्षा अधिक कोरोना लसी मिळतील, अशी अपेक्षा आहे. आमचे तज्ज्ञ देशभरात कोरोना लस कशी पोहोचवावी याचे प्लॅनिंग करत आहेत.
याआधी रविवारी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की, भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशासाठी लसीचा पुरवठा करण्याची प्राथमिकता अनेक बाबींवर अवलंबून आहे. यामध्ये त्या देशातील कोरोना संक्रमणाचा धोका, लोकांमध्ये अन्य रोगांचा प्रसार, कोरोनाचे मृत्यूदर आदी बाबी पाहिल्या जातील. आम्हाला शेवटच्या व्यक्तीपर्यंत कोरोना लस कशी पोहोचेल याची खबरदारी घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

Comments
Post a Comment