मेर्वीत बिबट्याने गायीवर हल्ला
तालुक्यातील मेर्वी-खर्डेवाडीतील जंगलात चरण्यासाठी गेलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केला आहे. जनावरे एकत्र चरत असताना बिबट्याने हल्ला केला. मात्र, बैलाने त्याला प्रतिकार केला असावा. त्यामुळे गाय बचावली आणि बिबट्या पळाला असावा, असा अंदाज गावकऱ्यांनी केला आहे. मेर्वी खर्डेवाडी येथील दिवाकर खर्डे यांनी नेहमीप्रमाणे आपली जनावरे जवळच असलेल्या जंगलात चरण्यासाठी सोडली. जनावरे चरत असताना ती मध्येच बिथरलेल्या अवस्थेत दिसली. साडेतीन वर्षे वयाच्या गायीच्या पाठीवर ओरखडे आल्याचे लक्षात आल्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे लक्षात आले.
गायीवर हल्ला केल्याने पळत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने ती लंगडत होती. खर्डे यांनी गायीला घरी आणून उपचार केले. तसेच वन विभागाला कळविले. त्यानंतर वन विभागाने घटनेचा पंचनामा केला. माणसांपाठोपाठ पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला करण्याचा हा पाचवा प्रकार घडल्याने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Post a Comment