पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी



पंढरपूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली. रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. तर शनिवारीदेखील पावसाने हजेरी लावली. गेले काही दिवस ‘ऑक्टोबर हिट’चा चटका सहन करावा लागला होता. मात्र परतीच्या पावसाच्या अंदाजानुसार तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसाने हवामानात बदल झाला असला तरी शेतकऱ्यांचे विशेषत: फळबागांचे नुकसान झाले आहे.

उन्हाचा चटका सहन करणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील नागरिकांना सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसाने काहीसा दिलास मिळाला आहे. गेले काही दिवस दुपारी कडक ऊन तर रात्री गारवा असे विषम हवामान होते. मात्र परतीच्या पावसाने चांगलाच जोर लावल्याचे चित्र दिसून आले. शनिवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजरी लावली. या २४ तासांत म्हणजेच शनिवारी जवळपास २१ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली. यात भाळवणी येथे ४६ मि.मी, करकंब येथे ३९,भंडीशेगाव येथे २७ तर कासेगाव येथे २३ मिमी.पावसाची नोंद झाली. पंढरपूर येथे ४, तुनाग्त येथे ८ तर पुळूज येथे ६ मि.मी पावसाची नोंद झाली. तालुक्यात एकूण १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

रविवारी दुपारपर्यंत ऊन पडले होते. मात्र साडे तीननंतर विजांचा कडकडाट  सुरू  झाला आणि पावसाची सुरुवात झाली. त्यानंतर पावसाने जोर धरला. शहरात अनेक ठिकाणी पाणी साठले होते. ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र या पावसाने बळीराजाच्या चिंता वाढवल्या आहेत. विशेषकरून फळबागांचे या पावसाने नुकसान होणार आहे. गेल्या महिन्यात सलग तीन दिवस पाऊस पडून मोठे नुकसान झाले होते. त्याचे तातडीने पंचनामे झाले.मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी वाट पहावी लागत आहे. असे असले तरी ऑक्टोबर हिटचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

Comments