अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात १२ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

 


रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६४ हजार शेतकऱ्यांचे भात आणि नाचणी पीक मिळून ११ हजार ८१२ हेक्टर नुकसान झाले आहे. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर झालेल्या मदतीच्या निकषानुसार ९ कोटी ६० लाख रुपयांची गरज भासणार आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे १० ते १५ या काळात कोकण किनारपट्टीवर पडलेल्या मुसळधार पावसाचा रत्नागिरी जिल्ह्यातील  भातशेतीला मोठा फटका बसला. या कालावधीत सुमारे ४५ टक्के भातशेती कापणीयोग्य झाले होती. ते  अनेकांनी कापणी करुन ठेवले होते. पण अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरात ते वाहून गेले. यांचा सर्वाधिक फटका संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्याला बसला आहे. 

तेथील नदीकिनारी भातशेती पाण्यामुळे आडवी झाली. ४८ तासांपेक्षा जास्त काळ शेती आडवी होऊन पाण्याखाली राहिल्यामुळे कुजून गेली. काही ठिकाणी पडलेल्या भाताला पुन्हा कोंब आले होते. कातळावरील कापलेली भातशेती वाया गेल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. तसेच पावसाचा जोर आठ ते दहा दिवस राहिल्यामुळे भाताचा दर्जा घसरण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हातातोंडाशी आलेले पीक अशा प्रकारे वाया गेल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालेला होता. या परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तत्काळ पंचनामे करण्याचा आदेश दिला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करा, असा आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कृषी विभागाला दिला. त्यानुसार कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे पूर्ण केले असून त्याबाबतचा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. सरकारकडून हेक्टरी १० हजार रुपये जाहीर केले आहेत; मात्र तसा शासन निर्णय अद्यापही आलेला नसल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी नुकसान भरपाई मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तालुकावार नुकसान

तालुका        क्षेत्र हेक्टरी      शेतकरी

मंडणगड       ७८३             ३२१०

दापोली          ७३३            ६१६९

खेड            १६९५            ७४५९

चिपळूण      १३३७             ७४५९

गुहागर         ७३४              ३९४६

संगमेश्वर    २२०६           १२२१९

रत्नागिरी     १८३५           १०२१९

लांजा         १३०४             ६९९२

राजापूर       ११८४           ७५३१

Comments