रत्नागिरीत राजकीय धमाका?

 


शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना पक्षात घेण्यासाठी भाजपने विशेष उत्सुकता दाखवली असून, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी राहुल पंडित यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गेली तीन - चार वर्षे भाजपकडून पंडित यांना निमंत्रण दिले जात असून, त्यांनी अजून आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

२०१६ साली झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेकडून राहुल पंडित खूप मोठ्या फरकाने विजयी झाले. दोन वर्षे त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. मात्र पक्षाचा निर्णय म्हणून त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला आणि पुन्हा झालेल्या निवडणुकीत प्रदीप तथा बंड्या साळवी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली.

त्यावेळी झालेल्या निवडणुकीपासून किंबहुना २०१६च्या निवडणुकीपासून राहुल पंडित यांनी भाजपकडून निवडणूक लढवावी, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते. मात्र खासदार विनायक राऊत आणि मंत्री उदय सामंत यांचे निकटवर्तीय असलेल्या पंडित यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला.

बंड्या साळवी नगराध्यक्ष झाल्यानंतर राहुल पंडित यांचे पक्षाकडून अन्य पदावर पुनर्वसन केले जाण्याची अटकळ बांधली जात होती. मात्र पक्षांतर्गत वा अन्य कोणतेच पद पंडित यांना देण्यात आले नाही. त्यामुळे राहुल पंडित पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूलाच गेले होते. त्यामुळेच भाजपने आता त्यांच्यासमोर पक्षप्रवेशाचा प्रस्ताव ठेवला असल्याची चर्चा आहे. बैठकीतील चर्चेची माहिती पुढे आली नसली तरी पुढच्या वर्षी पुन्हा नगराध्यक्ष निवडणूक होणार असल्याने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Comments