माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर याचे खंदे समर्थक भगवान नांगरे यांची उपसरपंच म्हणून तिसरी टर्म
सरुड (ता. शाहूवाडी) येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी भगवान बापू नांगरे यांची बिनविरोध निवड झाली. याआधीच्या उपसरपंचांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यावर राजीनामा दिल्याने गेले महिनाभर हे पद रिक्त होते. जिल्हा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मंगळवारी (ता.१४) ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी निवड सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी विहित वेळेत भगवान नांगरे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने सभेच्या अध्यक्ष सरपंच राजकुंवर पाटील यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी बी. डी. कडवेकर यांनी पाहिले.
दरम्यान माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर याचे खंदे समर्थक राहिलेल्या नवनियुक्त उपसरपंच भगवान नांगरे यांनी याआधीही सन २००२ ते २०१२ या सलग दहा वर्षांच्या काळात उपसरपंचपद भूषविले आहे. निवडीनंतर सरपंच राजकुंवर पाटील यांनी उपसरपंच नांगरे यांचा सत्कार केला. निवड सभेला मावळते उपसरपंच उत्तम पाटील, सदस्य दत्तात्रय रोडे-पाटील, बळवंत सोमोशी, सुनीता आपटे, उर्मिला पाटील, छाया नांगरे, संजय गुरव, नंदा थोरात, सुनीता कदम, वासंती घोलप आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment