मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का,प्रसिद्ध दिग्दर्शकाचा वयाच्या 84व्या वर्षी मृत्यू


मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 2020 या वर्षात मनोरंजन विश्वाने एका पेक्षा एक श्रेष्ठ आणि महान कलाकार गमावले. आज प्रसिद्ध दिग्दर्शक विजय रेड्डी यांच्या जाण्याची बातमी येताच पुन्हा एकदा मनोरंजन विश्व शोकाकुल झाले आहे. विजय रेड्डी हे कन्नड फिल्म इंडस्ट्रीमधील एक मोठे नाव आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहते वर्गाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या चाहत्यांसह अनेक कलाकार विजय रेड्डी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली. ANI च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

शुक्रवारी वयाच्या 84 व्या वर्षी चेन्नईमध्ये त्यांचे निधन झाले. विजय रेड्डी हे मुळचे आंध्र प्रदेश मधले असून कामाच्या शोधात या शेतकऱ्याच्या मुलाने मद्रास गाठले होते. त्यानंतर त्यांनी एक दिग्दर्शक आणि निर्मात म्हणून ख्याती मिळवली. त्याच्या नावावर हिट चित्रपटांची एक मोठी यादी आहे. त्यांच्या 1970 मध्ये आलेला 'रंगमहाल रहस्य' विशेष गाजला होता. विजय रेड्डी यांनी 37 कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे तर 16 हिंदी आणि 12 तेलगू सिनेमा दिग्दर्शित केले आहेत.प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार  याला देखील विजय रेड्डी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्याने देखील ट्विटरवर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला आहे. पुनीतने विजय रेड्डी दिग्दर्शित 'भक्त प्रल्हाद' चित्रपटात काम केले आहे. विजय रेड्डी यांचा 'गांधार गुडी' हा सिनेमा देखील विशेष गाजला होता.

Comments