ऊसतोड कामगारांना पंकजा मुंडे यांनी दिला धीर



बीड: ऊसतोड कामगारांसाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा त्यांच्यासाठी धावून आल्या आहेत. 'कामगारांच्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. सहकारी साखर कारखाने बंद राहिल्याचा थेट फटका ऊसतोड कामगारांना बसला आहे. आर्थिकदृष्ट्या त्यांचे हाल होत आहेत. त्यांना आधार मिळावा यासाठी पंकजा मुंडे प्रयत्नशील आहेत. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.

'माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जेष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवावा. आपल्या कोयत्याला न्याय नक्कीच मिळेल. तथापि, कोयत्याची धार आणि सन्मान सांभाळण्याची जबाबदारी ऊसतोड कामगार आणि मुकादमांवर देत आहे,' असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

देशात अचानक झालेल्या लॉकडाऊनच्या काळात ऊसतोड कामगारांचे मोठे हाल झाले होते. कामानिमित्त घरापासून दूर असलेले हे कामगार राज्याच्या विविध भागांत अडकले होते. उघड्यावर संसार थाटण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यावेळीही पंकजा मुंडे यांनी त्यांच्या दुरावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले होते.

Comments