देशासाठी आज काळा दिवस, बाबरी मशीद मग काय जादूने पडली का? - ओवेसी
बाबरी विध्वंस प्रकरणात 28 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयाच्या निर्णयावर एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशासाठी आजचा दिवस हा काळा दिवस, बाबरी मशीद काय जादूने पडली का? - असा सवाल ओवेसींनी उपस्थितीत केला आहे.लखनऊ येथील सीबीआय विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय हा आमच्यासाठी धक्कादायक आहे.
लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली होती. उमा भारती यांनी 'एक धक्का और दो...' म्हटलं हे अवघ्या देशाने पाहिले आणि ऐकले आहे. सीबीआयने आपल्या आरोपपत्रातही असं म्हटलं आहे. मग न्यायालयाने आपल्याकडे पुरावाच नाही असा निर्णय दिला, हा मुस्लिम समाजावर अन्याय आहे, असं ओवेसी म्हणाले.तसंच, सीबीआय सारख्या संस्थेच्या तपासावर या निकालामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण भाजप, संघ, विश्व हिंदू परिषद, शिवसेनेचा या प्रकरणात हात आहे. हे सर्व जगाला माहित आहे. त्यामुळे आज न्यायालयाचा हा निर्णय देशासाठी काळा दिवस आहे', असंही ओवेसी म्हणाले.
दरम्यान, आज लखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. यावेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासमवेत 18 आरोपी कोर्टात उपस्थित होते तर अडवाणी यांच्यासह काही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. यावेळी तब्बल 2000 पानांचा निकाल कोर्टात वाचण्यात आला. कोर्टाने यावेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत, हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केले आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी याचबरोबर उमा भारती यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.
याआधी सेशन ट्रायल क्रमांक 344/1994, 423/2017 आणि 726 / 2019 सरकार विरुद्ध पवन कुमार पांडे आणि वरील प्रकरणातील सर्व सुनावणी 16 सप्टेंबर रोजी संपली होती. त्यानंतर सुरेंद्र कुमार यादव, पीठासीन अधिकारी, विशेष न्यायालय, अयोध्या केस लखनऊ यांनी 30 सप्टेंबर 2020 रोजी निर्णय देण्याची तारीख निश्चित केली. बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते, त्यापैकी 32 सध्या जिवंत आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे. जण मरण पावले आहेत. या खटल्यात भाजप नेते एल के अडवाणी, मुरली मनोहर जोशी या दिग्गजांची आरोपी म्हणून नावं होती.

Comments
Post a Comment