नगरमध्ये राष्ट्रवादीच्या खेळीवर फडणवीसांनी घेतला आक्षेप
अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीमध्ये शिवसेनेनं लहान भावाची भूमिका घेत राष्ट्रवादीला सभापतीपदाचा मान दिला आहे. पण, या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या मनोज कोतकर यांच्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपने आता कोतकरांना नोटीस बजावली आहे.
25 सप्टेंबर रोजी अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापतींची निवडणूक पार पाडली. शिवसेनेनं ऐनवेळी माघार घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे नेते मनोज कोतकर यांची सभापतीपदी निवड झाली.
परंतु, त्याआधी मोठे राजकीय नाट्य घडले. राष्ट्रवादीने ऐनवेळेस भाजपातून मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली होती. मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी फारसा आक्षेप घेतला नाही. पण, या राजकीय खेळीवर आता फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भाजपने मनोज कोतकर यांनापक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.
विशेष म्हणजे, स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. परंतु, शेवटच्या दिवशी मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीने आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला होता.
त्यामुळे शहरांमध्ये राज्य सरकार चालवणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येच स्थायी समिती सभापतीसाठी निवडणूक होणार होती. परंतु, शिवसेनेनं निवडणूक होण्यापूर्वीच माघार घेतली. त्यामुळे मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती बिनविरोध निवड झाली. आता भाजपने नोटीस बजावल्यामुळे मनोज कोतकर यांना खुलासा करावा लागणार आहे.

Comments
Post a Comment