'या' जिल्ह्यात चाचण्यांचा धडाका



जळगाव जिल्ह्यात करोना संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत ३ हजार ६५१ प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. या क्षेत्रांतील नागरीकांचे सर्व्हेक्षण करुन संशयितांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४९ हजार २८४ इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर उपाय म्हणून प्रशासनातर्फे संशयितांच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहे. एका दिवसात (७ सप्टेंबर) ४ हजार ८५ संशयित व्यक्तींच्या तपासण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ४९ हजार २८४ इतक्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित रुग्ण वाढत आहेत. 

परंतु, जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेल्या ९ हजार ३९८ बाधित रुग्णांपैकी ८ हजार १५४ रुग्ण हे लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये तर जागरुक राहून आपल्या कुटूंबात कुणालाही करोना सदृश्य लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखिल जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांपैकी १ लाख १४ हजार २६७ अहवाल निगेटिव्ह तर ३३ हजार ६१८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात करण्यात आलेल्या तपासण्यांपैकी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचे प्रमाण हे २२.५१ टक्के इतके आहेत. 

तर पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २३ हजार ४३३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६९.४३ टक्के इतके वाढले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागात १४९०, जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात १०५३ तर जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ११०८ भाग हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.



Comments