जनआधार टाइम्सचे संपादक निलेश धुरी प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावले

 


गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी परिसरात होणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत सातत्याने आपल्या निर्भीड लेखणीतून वाचा फोडणारे, जनआधार टाइम्स साप्ताहिकाचे संपादक निलेश हरिश्चंद्र धुरी यांच्या राहत्या घरी जीवघेणा हल्ला करण्यासाठी आलेल्या अज्ञात समाजकंटकांना पत्रकार धुरी घरी नसल्याने दैव बलवत्तर म्हणून ते या हल्ल्यातून बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. हा दुर्दैवी प्रकार,आरे मयूर नगर कृष्णगंगा सोसायटीच्या सहाव्या मजल्यावर (दि.२६ सप्टेंबर)रात्रौ आठ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे समजते.धुरी यांना हल्ल्याची कल्पना असल्याकारणाने ते आधीच आरे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले असे म्हणावे लागेल. मात्र ते सुदैवाने बचावले असले तरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोकशाहीच्या चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर अशाप्रकारे हल्ला करण्यासाठी २० ते २५ समाजकंटक मयूर नगरात घुसून धुरी यांना जीवे मारण्यासाठी आले होते. यापैकी काही समाज कंटक बिल्डींगच्या बाहेर तर काही प्रत्येक मजल्यावर दबा धरून बसले होते. दोघे लिफ्टने तर अन्य दोघे चालत आल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले दिसत आहे.हिंदी भाषेत धुरीच्या पत्नीकडे या चौघांनी विचारणा केली.सोसायटी खाली दबा धरून बसलेल्याच्या हातात धारदार शस्त्रे होती. शिवराळ भाषा वापरून धुरी यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देत निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील एका प्रकरणाचा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणला होता.यावरून काही समाजकंटकांमध्ये पोटशूळ निर्माण झाला होता.संबंधित व्यक्तींवर पुराव्यानिशी आरोप सिद्ध केले होते. तर काहीं समाजकंटकांवर पोलिसांचा ससेमिरा मागे लागला होता.भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणण्यासाठी निलेश धुरी यांनी आपली निर्भीड लेखणी सातत्याने चालवली होती.नुकतीच शासनाचे ५ करोड रुपये थकविल्याबाबतची बातमी धुरी यानी प्रसिद्ध केली होती. त्यावर प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागत होती.यामुळेच पत्रकार निलेश धुरी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याच्या इराद्याने ते संशयित आले असावेत.असा आरे वासियांचा कयास आहे.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, कामगार नेते अभिजीत राणे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे .मुंबई शहराच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे असताना संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, व आरे पोलिसांनी संबंधित समाज कटंकांना ताब्यात घ्यावे.यापुढील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी पोलिसांवर राहिल,या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी.व पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याचं काम जनआधार टाइम्सचे संपादक निलेश धुरी यांच्यासारखे प्रामाणिक पत्रकार करीत असताना काही विघ्नसंतोषी समाजकंटक भ्याड हल्ल्याचा मार्ग अवलंबून त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा विनाकारण प्रयत्न करतात.याची प्रशासनाने दखल घेणे आवश्यक आहे.

मात्र ,या समाजकंटकांच्या प्रयत्नाला कधीच यश मिळणार नाही .आपल्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आरे पोलिसांनी समाजकंटकांचा त्वरित बंदोबस्त करावा.व संपादक निलेश धुरी यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी पुढे आली आहे.या भ्याड हल्ल्याची विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील दखल घेऊन धुरी यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.अखेर प्रवीण दरेकर,अभिजीत राणे व पत्रकार संघटनेच्या दबावानंतर दिनांक २९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री आरे पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद करत पाच ते सहा संशयित आरोपींना अटक केली आहे. आत्ता या हल्ल्याचा मास्टर माईंड कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत.

धुरी यांच्या घराजवळ सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गस्त वाढविण्याबाबत आरे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. व एक वाहन सोसायटी खाली उभे करण्याचे आदेश दिले असताना देखील अध्यापही त्याच्या सोसायटीजवळ अशाप्रकारे कोणतीही सुरक्षा देण्यात आलेली नसून पुन्हा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही,असे त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिकांनी सांगितले. 

Comments