कोरोनामुळे ३२ पत्रकारांच्या मृत्यूनंतरही विमायोजनेच्या घोषणेची अंमलबजावणी नाही..!

 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ यांनी पत्रकारांसाठी विमा योजना लागू करून ५० लाख रुपयांचा सुरक्षा कवच दिले. याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने पत्रकारांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कर्नाटक सह मध्य प्रदेश, व उत्तर प्रदेश मधील सरकार पत्रकारांसाठी विमा योजना लागू करून पत्रकारांना संरक्षण देत असेल तर महाराष्ट्र सरकारने सुविधा द्याव्यात. गेली नऊ महिने महाविकास आघाडीचे सरकार केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीच करत नाही. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ५० लाख रुपये देऊ, अशी घोषणा केली होती. परंतु आज पर्यंत पत्रकारांचे महाराष्ट्रात ३२ बळी गेल्यावरसुद्धा शासनाने ही योजना लागू केलेली नाही. यावरून सरकारच्या कार्यतत्परता व त्यांच्या कार्यप्रणालीचा प्रत्येय येत आहे. असेही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात जळगावकर यांनी म्हटले आहे. 

Comments