शासनाने सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकणाऱ्या आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी
शासनाने टपरी वर , दुकानात सुटी विडी सिगारेट विक्री करण्यासाठी बंदी घातली आहे . तसेच गुटखाबंदी केली आहे . सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकणाऱ्या आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करावी. कारण जिथे जावे तिथे लोक गुटखा खाऊन जागोजागी थुंकतात. रेल्वे स्थानक , बसस्थानक , पादचारी पूल , स्वच्छतागृह , शौचालय , मुतारी , रस्त्यावर , सिग्नल जवळ , चौकात , नाक्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी गुटखा खाऊन थुंकणाऱ्या लोकांमुळे खूप दुर्गंधी पसरते .
गुटख्याचा वास पण खूप उग्र येतो. सर्व ठिकाणी लाल लाल असे डाग पडतात आणि अस्वच्छता निर्माण होते. तसेच सार्वजनिक ठिकाणी सिगारेट विडी ओढून प्रदुषण निर्माण करणाऱ्या लोकांमुळे इतर धुम्रपान न करणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होतात. सध्याच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील काळातही तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या आहारी जाऊन आणि धुम्रपान करुन आजारी पडतो आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी जे साफ सफाई करणारे सफाई कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा याचा खूप त्रास होत आहे.
गुटखा खाऊन थुंकणाऱ्या आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सक्त विरोध केला पाहिजे. विषारी गुटख्यामुळे आणि धुम्रपानामुळे शरीरावर होणाऱ्या घातक दुष्परिणामां पासून युवा पिढीला वाचविण्यासाठी सर्व नागरिकांनी सिगारेट विडी गुटख्याला विरोध केला पाहिजे. सिगारेट गुटखा व्यसनमुक्ती करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत.
शासनाने लवकरात लवकर शहरी आणि ग्रामीण भागात संपूर्ण सिगारेट गुटखा बंदी करावी. तसेच गुटखा ,पान मसाला, खैनी, जर्दा खाऊन आणि धुम्रपान करुन सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यां लोकांमुळे , व धुम्रपान करणाऱ्या लोकांमुळे कोरोना व्हायरसचा धोका वाढू शकतो म्हणून अशा लोकांवर शासनाने कडक कारवाई करावी.

Comments
Post a Comment