जुवाठी शासकीय रोपवाटीकेचे व्यवस्थापक श्री. झेंडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

 


रोपवाटीकेमध्ये काम करताना झालेला अपघात लपवून त्या बदल्यात त्याच ठिकाणी नोकरीस लावण्याचे आश्वासन देत नंतर ते झिडकावून लावत जुवाठी येथील रोपवाटीकेचे व्यवस्थाक श्री. झेंडे यांनी शशांक सुनिल सावंत या गरीब मुलाची व त्याच्या पालकांची फसवणुक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जुवाठी ग्रामविकास मंडळाचे वतीने करण्यात आली आहे.         

तसे निवेदन पोलिस निरिक्षक राजापूर यांना जुवाठी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भिवंदे, सचिव संतोष कांबळे यांनी सादर केले आहे.जुवाठी येथील शशांक सुनिल सावंत हा जुवाठी येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये १३ जून ते २८ जून २०२० या कालावधीत नोकरीस होता. रोपवाटीकेमध्ये मशिनरीवर खत तयार करून त्याच्या गोळया बनविण्याचे काम केले जाते. या ठिकाणी शशांक व गावातील अन्य मुलेही कामावर जातात. दि. २८ जून रोजी शशांक हा मशीनवर काम करीत असताना अचानक मशीनमध्ये बोट अडकून मोडले व हातास मोठी इजा झाली. हा अपघात घडल्यानंतर श्री. झेंडे यांनी वैद्यकीय उपचार करण्यासाठी दवाखान्यात नेले व उपचार केले.

या अपघातानंतर झेंडे यांनी शशांक याचे हातास झालेल्या गंभीर दुखापतीचा विचार करता श्री. झेंडे यांनी शशांक याला रोपवाटीकेतच नोकरीस लावेन. याबाबत कुठेही तक्रार करू नका असे आश्वासन शशांक व पालकांना दिले होते. तर या अपघाताबद्दल आम्ही गावातील काही प्रमुख मंडळी याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असताना झेंडे यांनी तुम्ही काळजी करू नका शशांक याला नुकसान भरपाई मिळवून देवू तसेच रोपवाटीकेत नोकरी देवू असे आश्वासन दिले होते.

 मात्र याबाबत अलिकडेच नुकसान भरपाई व नोकरीबाबत विचारणा करण्यासाठी पालक व आम्ही गेला असता श्री. झेंडे यांनी सरळ सरळ धुडकावून लावले व तुम्हाला काय करायचे  ते करा अशी उद्दाम भाषा वापरली. श्री. झेंडे यांनी शशांक व त्यांच्या पालकांची घोर फसवणूक केली असून त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे श्री. भिवंदे व श्री. कांबळे यांनी केली आहे.

Comments