राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एशिया बुकमध्ये नोंद !!


आंबव येथील प्र. शि. प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार आणि त्यांचे इतर मित्र अशा सात विद्यार्थ्यांनी मिळून एक अनोख्या आंतरराष्ट्रीय विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यांनी व्हाईट बोर्ड वर फार कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या सह्या घेण्याचा संकल्प सिद्धीस नेला आणि याची दखल घेत ग्रुप मधील सातही विद्यार्थ्यांना एशिया वर्ल्ड रेकॉर्डतर्फे पदक व प्रशस्तीपत्रक प्रदान करुण गौरविण्यात आले आहे.  

महाविद्यालयाच्या मेकनिकॅल विभागामध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेणा-या श्रेयस डोंगरे, आदित्य जाधव, सुयोग अणेराव आणि कपिल मुळे या विद्यार्थ्यांनी यामध्ये सर्वोत्कृष्ट योगदान दिले आहे. मुख्यतः लेक्चर नंतर मधल्या वेळेत नोटबुकवर विविध प्रकारच्या सह्या तयार करणे किवा कार्टून बनविणे हा जवळपास अनेक विद्यार्थ्यांचा छंद असतो. हा छंद जोपासताना यातून एक विक्रम प्रस्थापित होऊ शकेल अशी कल्पना या विद्यार्थ्यांच्या डोक्यात सर्वांनी मिळून यावर विचार करून आरखडा बनविला.

याच दरम्यान कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिवर्सिटी मध्ये “व्हाइब्रंट” या टेक्निकल स्पर्धा कार्यक्रमात या विद्यार्थ्याना सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यावेळी महाविद्यालयाचे हे चार विद्यार्थी व संजय घोडावत युनिवर्सिटीमधील त्यांचे तीन मित्र श्रेणिक डोंगरे, ऋतिक दमाम व तेजस वडगावे अशा सात जणानी मिळून ही कल्पना या ठिकाणी तडीस नेण्याचा विचार केला.

सदर कार्यक्रमावेळी त्यांनी ८ बाय ४ फुटाचा व्हाईट बोर्ड घेऊन त्यावर ६३२० चौकोन तयार केले. त्यावर कार्यक्रमस्थळी येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी व मार्किंग करून त्यावर सह्या घेतल्या. १४ तास आणि २२ मिनिटामध्ये अशाप्रकारे तब्बल ३१३९ सह्या गोळा करण्यात त्यांनी यश मिळविले आणि हा आंतरराष्ट्रीय विक्रम घडविला.

एशिया बुक च्या नियमानुसार या विक्रमाची मान्यवरांकडून सत्यता तपासण्यात आली. त्यामध्ये सांगली कुपवाड महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्रकुमार ताटे, अॅड. सुरेश पाटील यांनी परीक्षण केले. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे उप कुलपती डॉ. व्ही. ए, रायकर तसेच रजिस्ट्रार डॉ. बी. एम. हिरडेकर यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य लाभले.

महाविद्यालयाच्या या चार विद्यार्थ्यांनी २०१९ मध्ये आईस्क्रीमच्या तब्बल १ हजार १६ काड्या, नारळाच्या वाट्या, लाकडाचा भुसा, गमच्या बाटल्यांची झाकणे यासारख्या टाकाऊ वस्तूंपासून महाविद्यालयाची प्रतिकृती तयार केली होती. या प्रतिकृतीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने दखल घेऊन त्याची नोंद केली होती. तसेच याच प्रतिकृतीने २०१९ या वर्षात भारतातील पहिल्या १०० रेकॉर्ड्समध्ये स्थान प्राप्त केले होते.

पुन्हा एकदा आपल्या कल्पक व कृतीशील विचारांनी  या विद्यार्थ्यांनी हा नवीन आंतरराष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करून  महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. रवींद्र माने, कार्याध्यक्षा सौ. नेहा माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, महाविद्यालयाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Comments