रत्नागिरी मत्स्य विभागाच्या साखरी नाटे सोडून सगळीकडे कारवाया, साखरी नाटे मध्ये पर्ससीन आणि एलईडी मासेमारी होत नाही का?

रत्नागिरीतील मत्स्य विभागामार्फत गेल्या काही दिवसात गणपतीपुळे ते दापोली या दरम्यान धडाधड कारवाया सुरू आहेत. एका कारवाईला तर सर्जिकल स्ट्राईकचीच उपमा देण्यात आली आहेत. मात्र या सगळ्या कारवाया फक्त याच भागात का? साखरी नाटे ते रत्नागिरी मिरकरवाडा बंदर या दरम्यान एकही अनधिकृत मत्स्य बोट नाही की काय असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 

राजापूर तालुक्यातील साखरी नाटे हे मोठे बंदर आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासेमारी व्यवसाय केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नंबरची मासेमारी साखरी नाटे खाडीकिनारी होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये साखरी नाटे ते मिरकर वाडा या भागामध्ये पारंपरिक व गावठी पद्धतीने करण्यात येणाऱ्या मासेमारीवर गंडांतर आल्याचे बोलले जात आहे. कारण या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून एलईडी आणि अनधिकृत पर्ससीन मासेमारी सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

साखरी नाटे परिसरातील काही पर्ससीन मच्छीमार राजकारणात उतरून राजकीय पुढाऱ्यांना निवडणुकांच्या माध्यमातून आपण कसे नेत्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यामुळे स्थानिक भूमिपुत्र असलेला गावठी पद्धतीचा मच्छीमार तसेच पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारा मच्छीमार भरडला जात आहे. माडबन, जैतापूर, धावूलवल्ली, साखरी नाटे, आंबोळगड, या भागांमध्ये देखील एखादा ड्रोन कॅमेरा असणे आवश्यक आहे त्या माध्यमातून या परिसरामध्ये अवैध पद्धतीची मासेमारी होते की नाही होते ते दिसून येईल. 

मात्र मत्स्य व्यवसाय खात्याचे साखरी नाटे परिसरातील काही अधिकारी अनधिकृत मासेमारी बाबत माहिती असून देखील जाणीवपूर्वक कारवाई करत नसल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे एकीकडे सर्जिकल स्ट्राइक करून कारवाया होत असल्याचे दाखवत असताना दुसरीकडे खरोखरच अवैध मासेमारी एखाद्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी मच्छी खात्याचे अधिकारी कारवाई करतात का आणि त्याबाबतची सविस्तर माहिती मंत्रिमंडळ, वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचवतात का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या