राजापूर तालुक्यातील कोंड्येचे सुपूत्र आणि सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ एकनाथ गोसावी यांनी केला भाजप मध्ये पक्ष प्रवेश
राजापूर तालुक्यातील कोंड्येचे सुपूत्र आणि सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ एकनाथ गोसावी यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस, राजापूर पंचायत समितीचे उपसभापती अभिजीत गुरव यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. श्री. गोसावी हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असून त्यांनी अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबविले आहेत. कोंड्ये-जुवाठी पंचक्रोशीमध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या प्रवेशामुळे या पंचक्रोशीमध्ये भाजपाला बळ मिळाले आहे.
राजापूर पंचायत समितीचे उपसभापती श्री. गुरव यांनी पुष्पगुच्छ देत भाजपा प्रवेशकर्त्या श्री. गोसावी यांचे भाजपमध्ये स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. एकनाथ मोंडे, अनसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारूती कांबळे, अखिल भारतीय ब्राम्हण संघाचे राजापूर तालुका अध्यक्ष रघुवीर बापट, भीमराव कोंडविलकर, संतोष धुरत, श्रीपत घाणेकर, जगदीश गुरव, अशोक महाडेश्वर, प्रशांत मोंडकर, अजय लाड, संतोष शिवगण, हर्ष सकपाळे, राहुल जाझम आदी पदाधिकारी, कार्यकर्तेे उपस्थित होते.
कोंड्येचे सुपूत्र श्री. गोसावी गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक म्हणून शासकीय सेवेमध्ये कार्यरत होते. नुकतेच नियत वयोमानानुसार मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आपल्या कौशल्यपूर्ण अध्यापनाच्या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी घडविले असून हे विद्यार्थी सध्या विविध क्षेत्रामघ्ये उच्चपदांवर कार्यरत आहेत. अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून त्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. अविष्कार कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोंड्ये या संस्थेचे गेली सव्वीस वर्ष ते अध्यक्ष म्हणून कार्यरत असून या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबविले आहेत. त्यामाध्यमातून त्यांनी गरजवंतांना मदतही केली आहे. उत्कृष्ठ वक्ता आणि लोककलावंत म्हणूनही त्यांचा नावलौकीक आहे. शांत, संयमी अन् अष्टपैलू-निर्भीड व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले श्री. गोसावी यांचा कोंड्ये-जुवाठी पंचक्रोशीसह तालुक्यामध्ये दांडगा जनंसपर्क आहे. प्रशासकीय कामकाजाचाही त्यांना चांगलाच अनुभव आहे. या सार्याचा त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला संघटनात्मक वाढ आणि बळकटीकरण करण्यासाठी फायदा होणार आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशाचे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह जनसामान्यांकडून जोरदार स्वागत केले जात असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा