राजापूर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब, राजापूर शहरातील बांधकाम विभागाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांना नगराध्यक्ष, उप नगराध्यक्षांना निमंत्रण नाही, पाणी पट्टी थकवल्या प्रकरणी राजापूर नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम उपविभाग, राजापूर कार्यालयाला पाठवली नोटीस
राजापूर प्रतिनिधी:-
राजापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक बांधकामे होत आहेत. मात्र त्याच्या उद्घाटन व भूमिपूजनाच्या कार्यक्रमांना राजापूर शहरातल्या लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले जात नाही. यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली असून मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर येथील उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी चांगलाच जाब विचारला. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकांवर देखील नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांचा नामोल्लेख नाही. अधिकारी हे जाणीवपूर्वक करीत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. दरम्यान या सगळ्या घटनांवरून स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये व वृत्तपत्रांमध्ये ज्या काय बातम्या येत आहेत त्या बातम्यांना प्रशासन उत्तर देणार आहे का. प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या मुळे राजापूर शहरातील नागरिक आमच्या पुढे प्रश्न उपस्थित करत आहेत. बांधकाम विभागातल्या प्रशासनाकडून अशा प्रकारे होत असलेला हलगर्जीपणा काँग्रेस पक्ष कधीही सहन करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष अजित जैतापकर, नगरसेवक सिद्धांत जाधव, नगरसेविका शबाना मुल्ला, नगरसेविका अफरोज झारी, काँग्रेस कार्यकर्ते निसार मुल्ला, गिरीश वादक आदी उपस्थित होते.
राजापूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय हे देखील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीची राजापूर नगर परिषदेकडून एनओसी घेण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे नवीन होत असलेल्या प्रांत कार्यालयाचे इमारत बांधणीसाठी सुद्धा राजापूर नगर परिषदेचे एनओसी नाही. आता राजापूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची नवीन इमारत होत आहे त्याच्याच बाजूला रेस्ट हाऊस दुरुस्तीचे काम करण्यात आले. या सगळ्या कामांना नगरपरिषदेची एनओसी नाही. मग एनओसी नसताना सार्वजनिक बांधकाम विभाग परस्पर बांधकामांना कशी काय सुरुवात करू शकते असा सवाल यावेळी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. या सर्व बांधकामांना अनधिकृत बांधकाम म्हणून नोटीस बजावण्यात यावी अशी शिफारस आम्ही राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्याकडे करणार आहोत. दरम्यान सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांनी गेली दोन वर्षे पाणीपट्टी भरलेली नसल्यामुळे राजापूर नगर परिषदेच्या वतीने त्याला नोटीस बजावण्यात आली असल्याची देखील माहिती मिळत आहे. या सर्व घटनांवरून आता राजापूर शहर आणि तालुक्यातला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा