राजापूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयासह अन्य दोन शासकीय इमारतींच्या बांधकामांना नगर परिषदेची एन ओ सी नाही? अनधिकृत बांधकाम म्हणून नोटीस काढणार?
राजापूर नगर परिषद हद्दीमध्ये नगर परिषदेची एनओसी न घेताच शासकीय इमारतींची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे राजापूर नगरपरिषद याबाबतीमध्ये कठोर भूमिका घेण्याच्या तयारी मध्ये असल्याचे बोलले जात आहे. नगररचना कायद्याच्या अनुषंगाने राजापूर नगर परिषदेच्या कोणत्याही परवानग्या नसताना शासकीय इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. खरे तर नगर परिषदेची एन ओ सी असणे अत्यावश्यक बाब असते. मात्र नगर परिषदेच्या नगर रचना अधिकाऱ्यांची एन ओ सी घेण्यात आलीच नसल्याची बाब समोर येत आहे.
यामध्ये राजापूर तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आणि त्यानंतर नगर परिषदेकडे परवानगीसाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण होण्या अगोदर राजापूर नगर परिषदेची एन ओ सी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ही इमारत अनधिकृत म्हणून ठरू शकते. त्याचप्रमाणे राजापूर सार्वजनिक विभागाकडील शासकीय विश्रामगृहाची इमारत दुरुस्ती. तसेच राजापूर तहसील कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला प्रांत कार्यालयाची इमारत उभारणीचे काम सुरू आहे. या कामांना राजापूर नगर परिषदेची एन ओ सी च घेण्यात आली नसल्याची बाब समोर येत आहे.
नियमानुसार सामान्य व्यक्तीला सुद्धा घर, इमारत बांधकाम करायचे असेल तर नगर रचना नियमानुसार परवानग्या घ्याव्याच लागतात. मग या शासकीय कार्यालयांना काही वेगळा नियम आहे का? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. दरम्यान या इमारतींच्या बांधकामांच्या संदर्भात राजापूर नगर रचना विभागाची परवानगी घेण्यात आलेली नसल्या कारणाने त्या त्या विभागांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा