रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीला सन २०२५ - २६ या वर्षात तब्बल ९.९१ कोटी ढोबळ नफा

माध्यमिक पतपेढीला ९.९१ कोटी नफा !
सर्वच विभागात विक्रमी वाढ

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीला सन २०२५ - २६ या वर्षात तब्बल ९.९१ कोटी ढोबळ नफा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत व्यवहाराशी संबंधित सर्वच बाबींमध्ये उच्चांकी वाढ नोंद झाली असल्याचे पतपेढीचे चेअरमन सागर पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केले. पतपेढीचे उपाध्यक्ष सुभाष सोकासणे, मानद सचिव श्रीम. मुन्नवर तांबोळी, सर्व संचालक मंडळ, पतपेढीचे सचिव तातेज विचारे, लेखाधिकारी अशोक कांबळी व सर्व कर्मचाऱ्यांच्या काटेकोर नियोजन व अथक परिश्रमामुळे पतपेढीचा प्रगतीचा आलेख गेली तीन वर्षे सातत्याने वाढत असल्याचे चेअरमन पाटील यांनी स्पष्ट केले. 
          सन २०२५ - २६ या आर्थिक वर्षात पतपढीचे ३१५३ सभासद असून पतपेढीला ढोबळ नफा रु. ९.९१ कोटी इतका झाला आहे. गतवर्षी च्या तुलनेत रु. १.०४ कोटी इतकी वाढ झाली आहे. बुढीत कर्ज निधी चे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत कमी झाले असून एनपीए ०.७५% वरून ०.७४% वर आला आहे. सन २०२५- २६ मध्ये एकूण ठेवी २९२.४७ कोटी इतक्या झाल्या असून या आर्थिक वर्षात रू.३३७.४४ कोटी इतका कर्ज पुरवठा संस्थेमार्फत करण्यात आला आहे. सभासदांना वेतनाच्या पटीत कर्जपुरवठा करण्याचा महत्वाचा निर्णय विद्यमान संचालक मंडळाने घेतल्याचा फायदा सभासदांना होत आहे. संस्थेचे खेळते भांडवल ४.६१% वाढले असून एकूण खेळते भांडवल ४३२.३२ कोटी झाले आहे. व्यवस्थापन खर्च खेळत्या भांडवलाच्या केवळ ०.७६ % तर वेतन खर्च ०.४८% आहे. संस्थेच्या स्वनिधीमध्ये जवळपास ७.२० कोटींने वाढ झाली असून एकूण स्वनिधी १७५.७६ कोटी झाला आहे.संस्थेच्या गंगाजळीत रु. ९०.६० लक्ष इतकी वाढ झाली असून ३१ मार्च २०२६ अखेर गंगाजळी रु. १९.४७ कोटी झाली आहे. 
            विद्यमान संचालक मंडळाने विकसित केलेल्या मोबाईल ॲप मुळे कर्जमागणी पासून सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. सभासदांना पतपेढीतून राष्ट्रीयकृत अथवा अन्य बँकेत व राष्ट्रीयकृत अथवा अन्य बँकेतून पतपेढी रक्कम ऑनलाईन पाठविणे शक्य झाले आहे. ॲप च्या माध्यमातून २६ कोटी १५ लाख रु चा व्यवहार झाला आहे. 
         सभासद हिताचे अनेक निर्णय संचालक मंडळाने घेतले असून निवडणूकी दरम्यान दिलेले सर्व शब्द काटेकोरपणे पाळले जात असल्याचे चेअरमन सागर पाटील यांनी सांगितले. यावेळी पतपेढीचे उपाध्यक्ष सुभाष सोकासणे, मानद सचिव श्रीम. मुन्नवर तांबोळी, ज्येष्ठ संचालक प्रदिप वाघोदे, सचिव तातेज विचारे व लेखाधिकारी अशोक कांबळी उपस्थित होते.

चौकट 
सभासद सहाय्यता योजनेचे ५६00 रू उन्हाळी सुट्टीपूर्वी 

गतसंचालक मंडळाच्या काळात तोट्यात आलेली सभासद सहाय्यता योजना नियोजनबद्ध कामकाजामुळे दि ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल रु. १.८७ कोटी इतकी फायद्यात आली आहे. पोटनियमातील दुरुस्तीनुसार सभासदांच्या जमा निधीच्या प्रमाणात रक्कम उन्हाळी सुट्टी सुरु दि.२७ एप्रिल रोजी ५६००रू पर्यंत रक्कम जमा करण्यात येणार आहे.

टिप्पण्या