राजेश मेस्त्री यांचे काव्य स्पर्धेत दुहेरी यश, मान्यवरांकडून गौरव

राजेश मेस्त्री यांचे काव्य स्पर्धेत दुहेरी यश, मान्यवरांकडून गौरव
मुंबई : चेंबूर येथील आरसीएफ (Rashtriya Chemicals and Fertilizers) परिसरात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित काव्य व घोषवाक्य लेखन स्पर्धेत मसुरे देऊळवाडा गावचे सुपुत्र राजेश मेस्त्री यांनी उल्लेखनीय कामगिरी करत दुहेरी यश संपादन केले. या स्पर्धेत त्यांनी काव्य लेखन तसेच घोषवाक्य या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत आपली साहित्यिक प्रतिभा सिद्ध केली.
आरसीएफ कंपनीतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, मात्र आपल्या प्रभावी लेखनशैली, आशयघन मांडणी आणि सामाजिक जाणीव यांमुळे राजेश मेस्त्री यांचे सादरीकरण विशेष ठरले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ आयपीएस अधिकारी विनीता साहू, एसीपी, मुंबई पोलिस तसेच आरसीएफचे सीईओ डॉ. राहुल जगताप उपस्थित होते. त्यांच्या हस्ते राजेश मेस्त्री यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या यशाचे कौतुक केले.
राजेश मेस्त्री हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे देऊळवाडा गावचे रहिवासी असून सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील विविध प्रश्नांवर भाष्य करत जनजागृती करण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. त्यांच्या या यशामुळे गावासह परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही त्यांनी विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवून आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यातही त्यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

टिप्पण्या