रत्नागिरी शहरातील मांडवी परिसरातून निलेश भोसले निवडणूक लढवणार, मांडवी, किल्ला परिसर गेली अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडून विकासापासून दुर्लक्षित

रत्नागिरी नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली आहे. या निवडणुकीला अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार आहेत. रत्नागिरी शहरातील गेली अनेक वर्षे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित असलेल्या मांडवी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून निलेश भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत. निलेश भोसले गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. मागील वर्ष दीड वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फूट होऊन अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गेले. तर काही कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटामध्ये गेले. मात्र आजही निलेश भोसले यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते निष्ठेने शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात काम करत आहेत. 

रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 14 ब सर्व साधारण या जागेवरून निलेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी या चिन्हांकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत. या प्रभागामध्ये मांडवी, कुरणवाडी, सामवाडी, हनुमान वाडी, पठाणवाडी, पेठ किल्ला, किल्ला परिसर, राजवाडी, भगवती बंदर, खडप मोहल्ला आदी गावे येतात. सत्ताधारी पक्षाकडून या परिसरामध्ये दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. गेली अनेक वर्षापासून या परिसरामध्ये अनेक विकासाची कामे प्रलंबित राहिली असल्यामुळे या भागातील नागरिकांची सुद्धा नाराजी आहे. त्यामुळेच या वेळेस निलेश भोसले यांना पाठिंबा देण्याचा निर्धार अनेक नागरिकांनी घेतला असल्याचे बोलले जात आहे. 

या परिसरातील रस्त्यांचे अनेक वर्षी डांबरीकरण करण्यात आलेले नाही, गटारांची सुयोग्य व्यवस्था नाही, अपुरा पाणीपुरवठा, ठिकठिकाणी कचऱ्याच्या समस्या, कचरा वेळेवर उचलण्यासाठी घंटागाड्या येत नाहीत. रत्नदुर्ग किल्ला, मांडवी समुद्र किनारा ही प्रमुख पर्यटन स्थळे असून देखील या परिसराचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात आला नाही. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पुरेशा सोयी सविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. नगर परिषदेच्या माध्यमातून या भागातील युवकांना छोटे-मोठे रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज होती मात्र असे काही घडताना दिसून आले नाही. दसपटवाडी ते भगवती बंदर रस्ता गेली अनेक वर्षे पूर्णता खराब झाला असून या भागातील लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागात काही महिला बचत गट सुद्धा आहेत मात्र त्यांना सुद्धा नगर परिषदेच्या माध्यमातून किंवा सत्ताधारी पक्षाकडून कोणत्याही प्रकारे मदत करण्यात येत नाही. पिण्याच्या पाण्याच्या नवीन लाईन टाकण्यात आले आहेत त्या सुद्धा लिकेज आहेत. स्ट्रीट लाईटची सुविधा सुयोग्य पद्धतीने चालत नाही. शहर बस वाहतुकीचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत. या भागातील तरुण, युवा वर्गाला व्यायामाची, खेळाची, वाचनाची आवड लागण्यासाठी व्यायामशाळा, वाचनालय सुरु करण्याची आवश्यकता आहे. प्रभागातील नगर परिषद शाळांचा दर्जा वाढवून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रश्न घेऊन निलेश भोसले निवडणुकीला उभे राहणार आहेत.

हे प्रश्न सोडवण्यासाठी निलेश भोसले यांना रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीमध्ये निवडून आणून नगर परिषदेत नगरसेवक म्हणून पाठवायचे आहे असा निर्धार अनेक नागरिकांनी घेतला आहे. प्रभाग क्रमांक 14 अ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण असून त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार रशिदा गोदड निवडणुकीच्या रिंगणात उभ्या राहू शकतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी आघाडी असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढण्यात येणार आहे. त्यामुळे मांडवी परिसरातील लोकांचा महाविकास आघाडीच्या या दोन्ही उमेदवारांना चांगला पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे. 

Comments